Tuesday, November 22, 2011

What's in the name? Everything!

आज तुझं नाव ठेवायचा दिवस. आजपासून तुला संबोधून संवाद सुरु होइल. And on this very day, we commit to ourselves a few things. हे लिहून ठेवून तुला कधितरी पुढे दाखवू आणि तेव्हाच आम्हाला पडताळूनही बघता येईल कि प्रत्यक्षात तसं वागण्यात आम्ही सफल झालो का आणि त्यामुळे तुझं काही नुकसान तर झालं नाही ना.
स्वतःला मूल होणं हा एक विलक्षण अनुभव आहे. सगळंच अकल्पित आणि चकित करून टाकणारं आहे. इथे पोचल्यावर अगदी नक्कीच जाणीव होते कि आपल्या समजुतीच्या अवाक्याबाहेरची शक्ती सगळं घडवून आणते आणि आपण फक्त पाहत राहतो. तुला ज्याक्षणी माझ्या आतून बाहेर येताना पाहिलं तो क्षण मला खरंच थिजवून टाकणारा होता. माझं मूल वगैरे काहीही भावना मनात नव्हती तेव्हा. होतं केवळ प्रचंड आश्चर्य ! आणि नव्हती का म्हणू, अजूनही नाही आहे अशी काही भावना. अशी चमकू नकोस. खलिल जिब्रानच्या ओळी आता पुरेपुर पटत आहेत. “तुमची मुलं ही तुमची नाहीत. जीवनप्रवाहाची ती अपत्ये आहेत. ती तुमच्यातून आलीत. तुमच्यापासून निर्माण झाली नाहीत. त्यांना फक्त प्रेम द्या. तुमचे विचार देऊ नका.” आमचा असा दृढ विश्वास आहे की प्रत्येक जीवाचा, त्यातील आत्म्याचा एक निश्चित उन्नती मार्ग असतो, काही अपेक्षित जीवनउद्दीष्टे असतात जी पुरी होण्यासाठी, त्याची आत्मिक प्रगती होण्यासाठी नवा जन्म घेतला गेलेला असतो. त्यानुसार, तुला तुझ्या या प्रवासात लागेल ती मदत देण्याचं काम आम्हाला नेमून दिलं आहे असं आम्ही समजतो. आम्ही देखिल तुझ्या थोडेसे आधी प्रवास सुरु केलेले तुझे सहप्रवासीच आहोत. हा अफाट पसारा आम्ही सुद्धा आमच्या आकलनशक्तीने जमेल तसा समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. तेव्हा तुला कधी अधिकारवाणीने हेच कर, हे करू नकोस, अशीच वाग, अशी रहा असं आम्ही सांगणार नाही. आम्हाला लागलेले खाचखळगे तुला जरूर सांगू पण तुला मार्गनिवडीचं स्वातंत्र्य अगदी नेहेमी असेल. अगदी लहानपणापासून तुला काय आवडतं याचं भान आम्ही आमच्या आवडीनिवडींच्या पलिकडे जाऊन ठेवू आणि त्याचा आदर करू. तुला विचारू तुझं मत अगदी छोट्यात छोट्या गोष्टीत. कारण तुला त्याच परमशक्तिने दिलेली एक विचारशक्ती असणार आहे, अभिव्यक्ती असणार आहे ज्याला प्रोत्साहन देणं आमचं काम आहे. या समाजात आपण राहतो म्हणून तुला जसं आज एक नाव मिळतं, तसाच जन्माने एक धर्म मिळतो, एक जात, पोटजात मिळते, आपल्या दोन्ही घरात चालणारे रीतिरिवाज, संस्कार मिळतात. हे सगळं आणि असंच बरंच काही आपसूकच मिळत जात असलं तरी तुझ्या विचारांनी तू यातलं काय योग्य, काय अयोग्य, काय तू जपावंस आणि काय तू बदलावंस हे ठरवायला मुक्त आहेस. अशी मोकळीक तुला नेहेमीच असेल. तू मुलगा म्हणून वाढण्याचा प्रश्नच नाही कारण तू मुलगी रूपाने इथे आली आहेस. पण तू एक मुलगी म्हणूनही वाढू नयेस तर एक माणूस म्हणून वाढावंस, जगावंस, जगणं अनुभवावंस असं खूप वाटतं. समाजातल्या याही भेदात तू कधी अडकू नयेस तर त्यापासून बंधमुक्त जगावंस. कुठ्ल्याच बाबतीत केवळ आम्हाला, समाजाला छान वाटावं म्हणून स्वतःच्या मनाविरूध्द, इच्छेविरूध्द जगण्या-वागण्याचं, स्वतःला योग्य वाटणारे विचार दाबण्याचं दडपण तू घेऊ नयेस. तू मुक्त असावंस, मुक्तं जगावंस. तूझं "तू" असणं आम्ही स्विकारू शकलो तरच आम्ही स्वच्छ प्रेम करू शकू तुझ्यावर. आपल्या नात्याचा आधार फक्त स्वच्छ, निस्वार्थी, निरपेक्ष प्रेम असावं, आणखी काहीच नको.
तुझ्यासाठी तशी बरीच नावं सुचली. निसर्गाची प्रत्येक निर्मिती निर्विवाद सुंदरच असते म्हणून तुला "तन्वी" म्हणावंसं वाटलं. तू स्वच्छंदे खूप फिरावंस, जीवनमार्गात खराखूरा भरपूर प्रवास करून अनुभवसंपन्न व्हावंस म्हणून "राही" म्हणावं वाटलं. आयुष्यात अनेक वेळा अनेक रूपात सापडू शकणारं उत्कट प्रेम, ज्यामुळे एक प्रकारची अद्भूत शांती, तृप्ती, श्रीमंती आणि समाधान अंतरात नांदतं, असं सशक्त प्रेम तुला समजावं म्हणून "राधा" म्हणावंसं वाटलं. नम्रपणा, सरळमार्गीपणा आणि सच्चाई या गुणांचं प्रतिक म्हणून "रूजुता" म्हणावं वाटलं. पण या सगळ्या सगळ्यापेक्षा महत्व वाटतं ते तू मुक्त असावंस, मुक्तं जगावंस यालाच, आणि म्हणून मुक्त अशी तू "मुक्ता", बंद शिंपल्याच्या पेटीतून आपली स्वतःची स्वतंत्र गुणवैशिष्टे घेऊन निपजलेल्या मोत्यासारखी तू "मुक्ता" !
मोठेपणी हे नाव तुला फारसं भावलं नाही तर ते बदलायलाही तू मुक्त असशीलच ! :)

3 comments:

  1. Sanika,

    Well narrated and well written blog...

    Not everyone has this level of thinking capacity.. Good Luck...

    Regards,

    SARITA KATRE

    ReplyDelete
  2. Sanika, khup chan lihila ahes. Asech sunder vichar tujha manat raho ani tu te tujha ajubajula pasravo. May the readers get inspired by this!

    Lots of Love,
    Pallavi

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete