Thursday, June 6, 2019

राधा-कृष्ण


तुला कृष्ण कळलाच नाही,
मला नेमकी माहीत राधा!
स्वतःपेक्षा दुसऱ्यावरती,
विश्वास हाच रिवाज साधा!

कृष्ण होता रुक्मिणीचा,
राधा अनयाची होती!
राधा-कृष्ण गोष्ट एका,
दिव्य निर्णयाची होती!

तेव्हासुद्धा नियतीची,
आधी झाली होती चूक!
नियतीनेच जाणली नंतर,
जगावेगळी मंगल भूक!

प्रितीच भक्ती होते तेव्हा,
प्रत्येक दोघं राधा कृष्ण!
पाप कुठलं,पुण्य कुठलं,
पडत नाहीत वेडे प्रश्न!

पूजा म्हणजे समर्पण,
अगदी आतून पटलं पाहिजे!
दोन वाती,एक जळणं,
तसं घट्ट भेटलं पाहिजे!

कोण कृष्ण कोण राधा,
कोण पाऊस,कोण तळं!
एक फूल त्याची कसं
गोरी पाकळी केशर निळं!

कृष्ण असा चंद्र ज्याची,
चांदणंच तर होती राधा!
मध आणि माधुर्याची,
कशी बरं असेल स्पर्धा?

राधा आणि कृष्णासारखं,
जगात कुठलं नाही काव्य!
अणूपेक्षा सूक्ष्म आणि
विश्वापेक्षा सुद्धा भव्य!

राधा कोण कशी वाचील?
कृष्ण कसा कोण सांगेल?
राधा झाली यशोदा तर,
योगेश्वर पण रांगेल!

द्वापारातले राधा-कृष्ण,
कलियुगात असू शकतात!
अगदी आपल्या शेजारी,
गोकूळ करून बसू शकतात!

नुसतं राधेवरती लिहा,
शब्द होतात कृष्ण!
लिप्त असून अलिप्त,
म्हणजेच राधा कृष्ण!

कृष्ण होऊन मैत्रीण पहा,
देह होतो कापूर!
मग पाय नसूनसुद्धा,
चाहूल देतील नुपूर!

म्हणून म्हणतो एकदा बघ,
डोळे घेऊन राधेचे!
मद्याच्याही पेल्यामध्ये,
थेंब दिसतील सुधेचे!


-- कवी माहीत नाही. ( Courtesy whatsapp fwd)

No comments:

Post a Comment