तुझा जन्म झाला त्या दिवसापासून
आनंदाचा एक अखंड सोहळा चालू आहे आमच्या आयुष्यात.
आम्ही अनुभवतोय एका बाळाचं मोठं होणं,
दिसामासांनी वाढत जाणं.
अन् आमचं आई-बाप बनणंसुद्धा!
खरं म्हणजे ज्या क्षणी एक मूल जन्माला येतं,
त्याच क्षणी एका आईचा अन् पित्याचाही जन्म होतो.
तुला घडवता घडवता आई-बाप म्हणून आम्हीही घडत गेलो
चुकत गेलो.. शिकत गेलो..
तुझ्या निरागस निष्पापपणाने आम्हास शिकवलं
फूल आपल्या डोळ्यांसमोर कसं उमलतं ते!
खोटं कधी बोलू नये, असं मी तुला सांगितलं
त्याच्या दुसऱ्याच दिवशी
‘ते घरात नाहीएत!’ असं फोनवर सांगणाऱ्या आईला
तू केलेला प्रश्न-
‘पण आई, पप्पा तर घरातच आहेत.
खोटं कधी बोलू नये ना..!’
त्या दिवसापासून आम्ही दोघंही शिकलो-
खोटं कधी बोलू नये.
अजूनही लक्षात आहे
रोज रात्री झोपतानाचा
‘पप्पा, गोष्ट सांग’ हा तुझा हट्ट.
अन् मी श्रावणबाळाची गोष्ट सांगितल्यावर
‘मी तुला कध्धी सोडून जाणार नाही,’
म्हणून इवल्या इवल्या हातांनी तू मला मारलेली गच्च मिठी.
तुझा शाळेचा पहिलाच दिवस
दरवाजातून दूर दूर जात तू मांडलेला आकांत
तुझ्या आईच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू
आणि ‘वेडी की काय तू?’ असं तिला म्हणत
मी हळूच पुसलेले माझे डोळे!
उघडय़ा डोळ्यांनी तू जग पाहायला शिकल्यावर
तुला पडणारे एकेक अद्भुत प्रश्न
आणि त्यांची मला कधीही न सापडलेली उत्तरं!
कपाळावर मिठाच्या पाण्याच्या घडय़ा ठेवूनही
न उतरणारा तुझा ताप
अन् माझा मानभावी पुरोगामीपणा विसरून
मी देवासमोर घातलेले दंडवत, भाकलेली करुणा.
त्या क्षणी झालेली जाणीव..
तू आम्हाला आमच्या प्राणांपेक्षाही प्रिय आहेस!
तू बालिश हट्ट केल्यावर ठेवून दिलेली चापट
तुझ्या डोळ्यांत आलेलं पाणी
आणि माझं गदगदलेलं काळीज
परमेश्वराने प्रसाद द्यावा
तसे काय काय मंतरलेले अनुभव
ओंजळीत टाकलेस तू आमच्या.
जगण्याच्या जाहिराती आणि मॅनर्स शिकवताना
मी शिकवलं होतं तुला ‘थँक्यू’ म्हणायला.
बाहेरगावाहून येताना तुझ्यासाठी आणलेली भेट
तू अधीर होऊन उलगडायचास
आणि माझा पापा घेऊन म्हणायचास-
‘थँक्यू पप्पा!’
एवढय़ा मोहरलेल्या क्षणांची भेट आम्हाला दिल्याबद्दल
आणि आमच्या आयुष्याला पूर्णाकार दिल्याबद्दल
आज आम्ही तुला म्हणतोय-
‘थँक्यू बेटा, थँक्यू..!’
-------------------------------------------------------
ek sundar kavya !! Hats off to Prasad Kulkarni
--Sanika
-------------------------------------------------------
No comments:
Post a Comment