Wednesday, November 4, 2009

कणा ! ------ कुसुमाग्रज

"ओळखलंत का सर मला ?" पावसात आलं कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.

क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून,
"गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून.

माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
रिकाम्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली !

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांमधे पाणी तेवढे ठेवले.

कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे,
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे."

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,
"पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवर हात ठेवून नुसतं ’लढ’ म्हणा !"
---------------------------------------------------
आपल्या जीवनात सच्च्या गुरू चे महत्व सांगणारी ही कविता माझ्या प्रिय गाडगीळ बाईंसाठी....
-Sanika
---------------------------------------------------

No comments:

Post a Comment