Sunday, October 11, 2020

राधार्पण

 Forward received on WhatsApp...loved it..

राधार्पण ... 

ऐन दुपारी कदंबाखाली 

कृष्ण अन त्याच्या सहस्त्र पत्नी 

रंग उधळूनी रास रचुनी 

गोफ गुंफती हरी भोवती 

इतक्यात सर्रकन अवचित रुतला

कमल चरणी हरीच्या काटा !!

राधा राधा सत्वर वदला 

घननीळ नेत्री अश्रू दिसला !

सुंदर भामा ,कोमल रखमा 

जांबुवंती अन वदली कमला 

बसता उठता राधा राधा 

नसे जागा का आमुच्या प्रेमा ? 

सोळा शृंगार तुझ्याचसाठी 

घास मुखी तव आमुच्या आधी 

दारी लाविला पारिजात हा 

सहस्त्र शैय्या तुझ्याचसाठी 

चिडली भामा, रुसली रखमा 

बरे न हे 'राधेला' विसरा 

कोण गोपी ती ? कुठल्या घरची ?

आम्हा सामोरी का तिची  मुजोरी  ?

नकोस फसवू , शपथ तुज सखया,

कलंक न हा भाळी लागो तुझिया,

उठले हरी ... दूर जाहले ... 

टक लावूनी..  अभ्र पाहिले ... 

शांत घटका सरली अन् मग,

मंजुळ वाणी बोलू लागले 

वृंदावन जेव्हा टाकिलें, अन् सोडिले राधेला,

पुन्हा न होणे भेट, माहित झाले भाबडीला 

माग म्हणालो आज काहीही,

माझी आठवण... खूण प्रीतीची...

बोलली राधिका झुकवून डोळे,

कधी न मागिले आज मागते..

सल जरी इवला, रुतला तुजला 

डंख तयाचा व्हावा मजला ! 

कमलदल पावलांना तुझिया 

पायघड्या ह्रदयीच्या व्हाव्या 

चाललास जरी दोन पावले,

क्षेम कुशल तव मज धाडाव्या 

म्हणून सखये ओठी राधा 

दोन तन मने एकच गाभा  

पाऊल जरी मी एक ठेवले 

ती भू नाही ग काळीज स्मरते !!

म्हणून सांगतो प्रिय सखी तू 

राधा मात्र माझे मी पण... 

राधे इतकी प्रीती मजवर

आहे कुणी का केली सांगा ? 

म्हणून सांगतो निजभक्तांना 

कृष्णा आधी बोला राधा... 

प्रितीचे ते सुंदर मंदिर

कशी करावी दूर आठवण ? 

राधा भरली कणा कणातून 

कृष्ण राहिला फक्त राधार्पण... !!!

Monday, October 5, 2020

माझ्या मित्रा

माझ्या मित्रा

ऐक ना,

मला दिसते नुसते चमकते अपरंपार आभाळ

अलीकडे दाट काळ्या रात्रीची शांत झुळझुळ

बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा

तीव्रमधुर तिथला वाऱ्याचा वावर

आणि मुक्त असण्याची त्यात एक मंद पण निश्चित ग्वाही

कितीदा पाह्य़लेय मी हे स्वप्न, झोपेत आणि जागेपणीही!

आज तुला ते सांगावेसे का वाटले कळत नाही

पण थांब, घाई करू  नकोस,

अर्धे फुललेले बोलणे असे अध्र्यावर खुडू नाही.

हे ऐकताना हसशील, तर  मर्द असशील;

स्वप्न धरायला धावशील माझ्यासाठी,तर प्रेमिक असशील,

समजशील जर शब्दांच्या मधल्या अधांतरात

धपापतेय माझे काळीज, तर मग तू कोण असशील?

स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील,

हाती देशील तर पती असशील,

आणि चालशील जर माझ्यासोबत

त्या उजळ हसऱ्या स्वप्नाकडे

समजून हेही, की ते हाती येईल, न येईल,

पण अपरिहार्य माझी ओढ, माझे कोसळणे, धापत धावणे

आणि माझा विश्वास, की माझे मलाच लढता येईल,

तर मग तू कोण असशील?

मित्र असशील माझ्या मित्रा!


– कवयित्री : अरुणा ढेरे

Tuesday, May 26, 2020

आज राणी.....

आज राणी, पूर्विची ती प्रीत तू मागू नको
कालचे वेड्या फुलांचे रंग तू मागू नको 

सांजता चाफ्याकळीचे चुटपुटीचे भेटणे 
पानजाळीतून झिरपे बावरेसे चांदणे 

त्या क्षणांचे, चांदण्यांचे स्पर्श तू मागू नको 
पाकळ्यांचे शब्द होती तू हळू निःश्वासता 

वाजती गात्री सतारी नेत्रपाती झाकता 
त्या फुलांचे, त्या स्वरांचे, गीत तू मागू नको 

रोखुनी पलकांत पाणी घाव सारे साहिले 
अन् सुखाच्या आसवांचे मीठ डोळा साचले 

या घडीला मोतियाचा घास तू मागू नको 
काय बोलू श्वासभारे चांदणे डहुळेल का? 

उमलण्याचे सुख फिरुनी या फुला सोसेल का?
नीत् नवी मरणे मराया जन्म तू मागू नको

- वा. रा. कांत

Friday, May 1, 2020

बगळ्यांची माळ फुले

Bagalyanchi Maal Phule is a Marathi Bhavgeet song composed by Shriniwas Khale, and sung by Pandit Vasantrao Deshpande.

Music: Shriniwas Khale

Lyrics: Va. Ra. Kant

Singer: Pandit Vasantrao Deshpande

बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात

भेट आपुली स्मरशी काय तू मनात

छेडीती पानांत बीन थेंब पावसाचे

ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे

मनकवडा घन घुमतो दूर डोंगरात

त्या गाठी, त्या गोष्टी, नारळीच्या खाली

पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा झाली

रिमझिमते अमृत ते विकल अंतरात

हातांसह सोन्याची सांज गुंफताना

बगळ्यांचे शुभ्र कळे मिळुनी मोजताना

कमळापरी मिटती दिवस उमलुनी तळ्यात

तू गेलीस तोडूनी ती माळ, सर्व धागे

फडफडणे पंखाचे शुभ्र उरे मागे

सलते ती तडफड का कधी तुझ्या उरात

Thursday, June 27, 2019

*सावळी बकुळी*

रुसुन बसली एकदा
कृष्णवाटिकेत बकुळी
सगळी पुष्प लेवती मोहक रंग
मीच एकटी का सावळी

वाटिकेतील फुले पाने लता
कुजबुजती एकमेकांच्या कानात
नाजुक साजुक आपली कन्या
का बरे मुसमुसे एका कोपर्‍यात

गेल्या तिला समजवायला
मोगरा सोनटक्का सदाफुली
बकुळी म्हणे उदास होऊन
शुभ्रतेपुढे तुमच्या दिसे मी कोमेजलेली

गुलाबराजा आला लवाजमा घेऊन
म्हणे कसले हे वेड घेतले मनी
बकुळी प्रश्न विचारी मुसमुसुन
का मोहक पाकळ्या लेवु शकत नाही तनी

सरतेशेवटी आला पारिजातक
सडा पाडत बकुळीच्या गालावर
थांब तुला सांगतो गुपित
मग हास्य फुलेल भोळ्या चेहर्‍यावर

कृष्णाने माझी भेट दिली सत्यभामेला
सडा मात्र पडे रुक्मिणीच्या अंगणात
भोळ्या राधेला काय बरं देऊ
हा विचार अविरत चाले भगवंताच्या मनात

तितक्यात आलीस तु सामोरी
गंधाने दरवळली अवघी नगरी
शुभ्र नाजुक तुझी फुले पाहुन
भगवंत म्हणती हिच राधेला भेट खरी

अलगद तुला घेता हाती
स्पर्शाने तु मोहरलीस
भरभरुन सुगंध देऊन हरीला
सावळ्या रंगात मात्र भिजुन गेलीस


ऐकुन हे बोल प्राजक्ताचे
बकुळी देहभान विसरुन गेली
अलौकिक आनंदाने होऊन तृप्त
राधाकृष्णाच्या प्रेमरंगात रंगली

☺☺
*©सौ. सारा दिक्षित*
🌹🌹
२५-०६-२०१९
- courtesy whatsapp FWD

Thursday, June 6, 2019

राधा-कृष्ण


तुला कृष्ण कळलाच नाही,
मला नेमकी माहीत राधा!
स्वतःपेक्षा दुसऱ्यावरती,
विश्वास हाच रिवाज साधा!

कृष्ण होता रुक्मिणीचा,
राधा अनयाची होती!
राधा-कृष्ण गोष्ट एका,
दिव्य निर्णयाची होती!

तेव्हासुद्धा नियतीची,
आधी झाली होती चूक!
नियतीनेच जाणली नंतर,
जगावेगळी मंगल भूक!

प्रितीच भक्ती होते तेव्हा,
प्रत्येक दोघं राधा कृष्ण!
पाप कुठलं,पुण्य कुठलं,
पडत नाहीत वेडे प्रश्न!

पूजा म्हणजे समर्पण,
अगदी आतून पटलं पाहिजे!
दोन वाती,एक जळणं,
तसं घट्ट भेटलं पाहिजे!

कोण कृष्ण कोण राधा,
कोण पाऊस,कोण तळं!
एक फूल त्याची कसं
गोरी पाकळी केशर निळं!

कृष्ण असा चंद्र ज्याची,
चांदणंच तर होती राधा!
मध आणि माधुर्याची,
कशी बरं असेल स्पर्धा?

राधा आणि कृष्णासारखं,
जगात कुठलं नाही काव्य!
अणूपेक्षा सूक्ष्म आणि
विश्वापेक्षा सुद्धा भव्य!

राधा कोण कशी वाचील?
कृष्ण कसा कोण सांगेल?
राधा झाली यशोदा तर,
योगेश्वर पण रांगेल!

द्वापारातले राधा-कृष्ण,
कलियुगात असू शकतात!
अगदी आपल्या शेजारी,
गोकूळ करून बसू शकतात!

नुसतं राधेवरती लिहा,
शब्द होतात कृष्ण!
लिप्त असून अलिप्त,
म्हणजेच राधा कृष्ण!

कृष्ण होऊन मैत्रीण पहा,
देह होतो कापूर!
मग पाय नसूनसुद्धा,
चाहूल देतील नुपूर!

म्हणून म्हणतो एकदा बघ,
डोळे घेऊन राधेचे!
मद्याच्याही पेल्यामध्ये,
थेंब दिसतील सुधेचे!


-- कवी माहीत नाही. ( Courtesy whatsapp fwd)

Wednesday, September 16, 2015

S-VYASA युनिव्हर्सिटी बंगलोर – एक अविस्मरणीय अनुभव



गेल्या ३-४ वर्षांपासून माझ्या एका प्रिय मैत्रिणीमुळे प्रेरित होवून योगाभ्यासाबद्दल मनात ओढ निर्माण झाली. तसे लहानपणापासून घर, शाळा, बालभवन मधे योगासनांशी ओळख झाली होती. घरी आईवडील आणि सासूसासरे देखिल योगासने करतात त्यामुळे त्यांचीही प्रेरणा होतीच. त्यामागची वैचारिक बैठक, अध्यात्मिक दृष्टीकोन, मन आणि शरीर यांचा स्वास्थ्यसंबंध याचा शास्त्रोक्त अभ्यास सुरु व्हावा यासाठी मी आखीव अभ्यासक्रम असलेला कोर्स शोधू लागले. मला हिसार हरयाणा मधे बसून हे सर्व करायचं होतं. पण हरयाणा राज्य मला अनोळखी आणि या राज्याला योगाभ्यास ही बराचसा अपरिचितच ! J तेव्हा computer वर distance yoga courses शोधताना S-VYASA (Swami Vivekanand Yog Anusandhan Sanshta) ही युनिव्हर्सिटी सापडली! लांबून योगासनं कशी शिकणार असा प्रश्न बरेच लोकांनी मला विचारला ! J युनिव्हर्सिटी ने पाठवलेली पुस्तके, CDs, सहा महिने अभ्यासून, assignments करून,  Yoga for Children या विषयावर research report करून, सुर्यनमस्कार, आसने, षट्क्रियांपैकी जलनेती, वमनधौती यांचा सराव करून ७ दिवसांच्या contact program साठी मी बंगलोरला जायचे योजले. मुक्ताच्या जन्मानंतर एवढे दिवस एकटीने कुठेतरी जाणे ही एक नवीनच गोष्ट होती. जवळजवळ ६ वर्षांनंतर असे स्वातंत्र्य अनुभवायचे बळ जनार्द्न आणि आईबाबांच्या मदतीने मिळाले. त्यांच्यावर तिला सोपवून मी निर्धास्तपणे निघाले.
मुख्य प्रशिक्षण आणि परिक्षण ७ दिवस व प्रवास धरून ९ पूर्ण दिवस असे हे adventure होते. विमानाने जाऊन सुद्धा लांबचा पल्ला होता. हिसार-दिल्ली २०० कि.मी. taxi , दिल्ली-बंगलोर १८०० कि.मी विमानाने, एअरपोर्ट बस आणि पुढे रिक्षा करून ३० कि.मी. नंतर युनिव्हर्सिटी चे सिटी ऒफिस गाठले. आणि त्यांच्या गाडीने पुढे ४० कि.मी. जाऊन जिगानी खेड्यात वसलेल्या युनिव्हर्सिटी परिसरात म्हणजेच प्रशांती कुटीरम ला पोचले. सकाळी ५.३० ला सुरू झालेला प्रवास रात्री ८ ला संपला. त्या गडद संध्याकाळी युनिव्हर्सिटी स्टाफ ने आम्हाला भेटून dormitory चा आणि प्रथम खानावळीचा रस्ता दाखवला कारण भोजन वेळ ८.३० ला संपणार होती. तेव्हाच लक्षात आले की इथे वेळेची शिस्त आहे ! नंतर एक खोली रिकामी झाल्याने मला आणि अजून एकीला ती देण्यात आली. ते एक प्रकारे बरेच झाले हे नंतर रोज ४.३० ला पहाटे उठायला लागल्यापासून समजले ! J त्या दिवशी पूर्ण प्रवासभर असे लोक भेटत गेले आणि गोष्टी घडत गेल्या की आपण योग्य करत आहोत, चांगल्या जागी जात आहोत याची परत परत खात्री वाटत राहिली. विमानात शेजारच्या सीटवर बसलेल्या बंगलोरवासीयाने स्वत:हून जवाबदारी घेऊन मला एअरपोर्टवर उतरल्यावर योग्य त्या बस मधे बसवून दिले. शिवाय बस कंडक्टरशी यंडूगंडू बोलून मला योग्य बसस्टॊपवर उतरवायची जवाबदारी दिली ! त्यानी पण मला बसचा रस्ता एका सभेमुळे बदलला तरी पत्ता परत बघून त्यातल्या त्यात जवळच्या थांब्यावर उतरवले. नंतरच्या रिक्षावाल्याने पण फार आढेवेढे न घेता २ च कि.मी. वर असलेल्या युनिव्हर्सिटी सिटी ऒफिसला शोधून पोचवले. त्या दारातच एक भला मराठी माणूस भेटला आणि नंतर युनिव्हर्सिटीत पोचल्यावर ही गुणी रूममेट भेटली. गोष्टी घडवणं आणि त्या घडत जाणं यात घडणं जास्त आनंद देतं. It feels like it was meant to be!!
खरे adventure  दुसरे दिवशी सकाळपासून चालू झाले.पहाटे ४.३० ला दिवस सुरू. मग दिवसभर विविध sessions. पहाटे ५ ते ५.३० ओम मेडिटेशन, ५.३० ते ७ खूप सारे व्यायाम, सुर्यनमस्कार, योगासने, कधी कधी षट्क्रियांचा सराव असे सर्व चालायचे. ७ ते ७.३० कपडे धुणे, आंघोळ मग ७.३० ते ८ न्याहरी, ८ ते ९ हनुमानचालीसापठण, भगवद्गीता मंत्रपठण, शिवाय योगी, सात्विक आचारण कसे असावे इत्यादी विषयांवर व्याखाने असायची त्याला मैत्रीमिलन असे नाव होते. BSc, MSc, Phd करणारे सर्व विद्यार्थी आणि distance education वाले आम्ही असे सगळे तिथे एकत्र असायचो. सामूहिक पठण छान वाटायचे. प्रोजेक्टर वापरून श्लोक आणि त्यांचा अर्थ डोळ्यासमोर ठेवला जायचा. संस्कृत भाषेची संपन्नता अनुभवताना मंत्रमुग्ध वाटायचे.  त्यानंतर ९ ते ९.४५ कर्मयोग म्हणजे जे सांगतील ते काम करायचे. अहं, इगो, प्रतिष्ठा बाजूला ठेवून परिसर स्वच्छता, झाडू मारणे, वर्ग व बसायची जागा साफ करणे, कचरा उचलणे, स्वयंपाकघरात भाजी चिरणे अशी विविध कामे दिली जायची. वॄथा अभिमान गाळून टाकणे आणि आळस झटकून कर्मयोगी बनण्यातली ही प्रथम पायरी. त्यानंतर १० ते १ अनेकविध विषयांवर व्याख्याने असत. योग म्हणजे काय, योग म्हणजे काय नाही, भारतीय पुराणकालीन संस्कृती, वेदाभ्यास, शुध्दीक्रियांचे( षट्क्रिया ) प्रकार, उपयोग, आसने शिकवण्याची युनिव्हर्सिटीने प्रस्थापित केलेली पध्दती, ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, राजयोग, कोणत्याही मार्गाने योगसाधना करून अंतिम लक्ष्य मोक्ष, आनंद अशा कमी अधिक जड विषयांवर शिकवणी व्हायची. मग १ ते २.३० जेवण व आराम, ३ ते ४ प्राणायाम विविध प्रकार, महत्व, फायदे यांचा अभ्यास, ४ ते ५ cyclic meditation हा त्यांनी प्रस्थापित केलेला उपनिषदांवर आधारित मेडिटेशन प्रकार आहे. कायिक आणि मानसिक शांतीसाठी अत्यंत प्रभावी. सन्ध्याकाळी ५ ते ६ मधे माल्ट घातलेले दुध पिऊन ताजेतवाने होऊन क्रिडा योग म्हणजे ग्रूप गेम्स, मेमरी गेम्स् इत्यादी असायचे. ६ ते ६.३० तेथिल मन्दिरात जाऊन भजन असायचे. इथे मात्र मी रमू शकले नाही. मुर्तिपूजन, देवाचे अवतार, त्यांची भक्तिगीते याबद्दल मला अजून तरी ओढ वाटलेली नाही. यानंतर ६.३० ते ७.१५ त्राटक सराव म्हणजे डोळ्यांसाठी शुद्धीकरण क्रिया, मन:शांती, एकाग्रता वाढवण्यास उपयुक्त असा हा प्रकार आहे. त्यानंतर रात्री ७.३० ते ८.३० जेवण आणि ८.३० ते ९.३० happy assembly असायची. म्हणजे सगळ्यांनी मिळून शेवटच्या दिवशी एक रंगारंग कार्यक्रम बसवायचा त्याची आखणी, सराव करण्यासाठीचा हा वेळ असायचा. आमच्या ग्रूप ने दशावतार आसनांच्या सहाय्याने दाखवले होते. काहींनी नृत्य, नाटिका, समूहगीत असे पाऊण तास सादरीकरण शेवटच्या संध्याकाळी झाले.  याचा मूळ उद्देश प्रशिक्षणार्थींनी एकमेकात मिसळावे, दुजाभाव संपावा, अहंभाव नसावा, नेतृत्वगुणांना वाव, सामाजिक एकत्रीकरण व्हावे असा होता. आम्हा ३५ जणांमधे एक १७ जणांचा गट केरळ मधून आला होता. सुरूवातीला ते सर्व खूपच त्यांच्यात्यांच्यात असायचे, मल्याळीच बोलायचे पण शेवटच्या दिवसापर्यंत बरेच मोकळे झाले. मला देखिल सुरुवातीला त्यांची गटबाजी, यंडूगुंडू च्यावच्याव असह्य होत होती. पण ७ दिवसांच्या शिकवणीतून Tolerance and Acceptance यातला फरक लक्षात आला आणि मग मी त्यांच्याबरोबर आनंद घेऊ लागले. Tolerance चा अर्थ एका शिक्षकाने समजावला तो म्हणजे बाहेरून शांत पण आतून खदखद, चिडचिड. पण Acceptance म्हणजे दोन्ही स्तरावर शांतता. समोरच्याला आहे तसे स्विकारणे, no anger, no criticism, no efforts to change someone.  म्हणूनच की काय, एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि वेगळी वाटली की कोणत्याच शिक्षकाने कधी आसनांबद्दल, आमच्या विविध परीक्षा घेतल्या त्याबद्दल आमचे फार कौतुकही केले नाही किंवा चुकांवर टिकाटिपण्णी तर अजिबातच नाही. स्वपरिक्षण, स्वयंशिस्त आणि स्वयंसुधारणा यावरच भर होता. इथली अजून एक खासियत म्हणजे जुन्या नव्याचा उत्तम संगम. वेदकालीन गुरूकुल पद्धती ही शिकायला मांडी घालून खाली बसण्यापासून ते काही ज्येष्ठ शिक्षकांच्या कुटीमधे शिकायला जाण्यापर्यंत, यज्ञयाग, मंत्रपठण, संस्कृत भाषेचा अध्ययनात वापर, प्रत्येक गोष्टीची सुरूवात आणि शेवट श्लोकपठणाने करणे अशा प्रकारे अनुसरली जाते. पूर्णवेळ कोर्सेस चे विद्यार्थी इथेच राहतात, जेवतात. पण त्याचबरोबर, projector, computer, online library, CDs, distance education, English medium of instruction याचाही वापर आधुनिक जगाशी संयुक्तिक आहे. संपूर्ण ७ दिवस कोणालाही चिडलेले, रागावलेले, उपरोधिक, जोरात ओरडताना, वैतागताना, अपमान करताना, हुकुम गाजवताना पाहिले नाही. Bsc yoga (३ वर्ष) and BNYS (Bachelor of naturopathy and yogic science) (५ वर्ष) साठी येणारी अगदी कोवळ्या वयातली मुले १२वी नंतर इतक्या लांब येऊन एका वेगळ्या जीवनपद्धतीचा हिस्सा बनतात हे खूप विलक्षण वाटले. त्यांना रविवारी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत बाहेर जायला परवानगी असते. प्रशांती कुटीरम बंगलोर एअरपोर्ट पासून ७० कि.मि. दूर एका खेड्यात १५० एकर जागेवर वसले असल्याने बाह्यजगाशी या मुलांचा संबंध फारसा येत नाही. मोबाईल चा वापर होता पण ठिकठिकाणी बंद ठेवा, silent ठेवा असे संदेश होते. तरूण वयात उसळत्या harmones बरोबर spirituality शिकणं, संयम शिकणं हे किती अवघड जात असेल असं मला वाटत राहिलं. पण जमेल त्या मार्गाने योगाभ्यासाची ओळख अगदी लहान वयापासून मुलांच्या विश्वात करून द्यायला हवी हे मनापासून पटलं. योग म्हणजे केवळ आसनं नव्हे. ती एक जीवनपद्धती आहे. मूल्यशिक्षण, खरा आनंद वस्तूत नसून स्वत:च्या शांततेत आहे, समाधानी, तॄप्त असणं, हव्यास न धरणं, राग, मत्सर न करणं, हे सगळं मुलांना लहानपणापासून शिकवणं म्हणजेही योगच की!
प्रशांतीचा परिसर हिरवागार आहे, सोलर वीजेचा वापर, जास्तीत जास्त नैसर्गिक जगण्याचा प्रयत्न, खाण्यामधे पूर्णत: शाकाहारी, सात्विक पण चवदार पदार्थ, स्वत:चे ताट स्वत: धुणे, काही दालनांत इतरांना वाढणे किंवा काही ठिकाणी बुफे पद्धत असे दोन्ही असायचे. चहा कॊफी ऐवजी नवधान्यांचे माल्ट घातलेले दूध दोन्ही वेळेस असायचे. त्यांचीच गोशाला आहे तेथिल गायींचे ताजे दूध असायचे. चार ठाव भरपेट खाऊन सुद्धा २ किलो वजन घटले. कारण सोबत व्यायाम, शिस्तशीर दिनक्रम, शांतता, नैसर्गिक स्वस्थ वातावरण पण होते. पहिले २ दिवस सतत मांडी घालून खाली बसणे, व्यस्त आखलेले रटीन पाळणे, वेळा काटेकोर पाळणे, मुक्ताची, घरच्यांची आठवण यामुळे काही प्रमाणात मानसिक आणि त्यामुळेच शारिरीक अस्वस्थता वाटत होती. पण नंतर तो कमकुवतपणा मागे पडला. आई झाल्यापासून असे केवळ स्वत:बरोबर एकटे असणे याची सवयच उरली नव्हती J ! स्वत:च्या शरीराबद्दल, अगदी श्वासाबद्दल जागरूक रहायला आपण वेळ देत नाही. स्वस्थ पडून, डोळे मिटून एकेका अवयवाकडे, श्वासाकडे बघणे हे ऐकायला विचित्र वाटते पण ते जरूरीचे आहे. व्यायामाबरोबरच Deep relaxation हे सुद्धा वजन कमी करण्यासाठी, स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. पहाटे ५ ला  खोलीतून निघून ध्यानवर्गाकडे जातानाची निरव शांतता, अंधारात दिसणारं तारांगण, आणि वातावरणातली मंत्रमुग्ध करणारी प्रसन्नता मी विसरू शकत नाहीये. डोळे मिटून शांत बसणं इतकी साधी गोष्ट तरी आपण रोज करायला हवी. विचारहीन अवस्था ही अजून पुढची गोष्ट. आतला आनंद शोधणं, तो समजून घेणं हे सगळं अजून पुढे आहे. एकूणच या सगळ्याबद्दल विचार करायला वेळ मिळाला. इथली सर्व मुलं, शिक्षक एकदम फिट दिसायचे. व्यायाम, योगाभ्यासामुळे एक वेगळं तेज, शारिरीक स्वास्थ्य जाणवायचं, लवचिकता अचंबित करायची. हे सर्व पाहून खुप हुरुप वाटला. संस्कृत भाषा, वेदाभ्यास, योगिक ज्ञान कालवश होवू नये, यात प्रचंड शक्ती, ज्ञान सामावलेलं आहे. त्यायोगे ह्या युनिव्हर्सिटीचे काम अनमोल आहे. वैयक्तिक आयुष्यात योग अंगिकारणं हा एक सुखकर आणि नवनविन अनुभव देणारा प्रवास आहे. अभी तो सिर्फ शुरूवात आहे. Miles to go before I sleep!
- सानिका सुरेश बापट